
प्रतिनिधी-मनोहर गोरगल्ले
शेतकऱ्यांसाठी लवकरच विशेष मार्गदर्शन शिबिर
औदर गावामध्ये कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन विविध शासकीय योजना आणि शेती प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी केली. या दौऱ्यात तालुका कृषी अधिकारी श्री. वैभव विश्ववे, मंडळ कृषी अधिकारी श्री. प्रकाश पवार आणि सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती वाघ मॅडम यांनी सहभाग घेतला.
या पाहणी दौऱ्यादरम्यान अधिकाऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांतर्गत शेतकऱ्यांना देण्यात आलेले ट्रॅक्टर, शेततळी तसेच ‘राम कृष्ण हरी शेतकरी बचत गटा’ला पुरवण्यात आलेल्या भुईमूग बियाणे प्रात्यक्षिक प्रकल्पाची प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी अधिकाऱ्यांनी भुईमूग बियाणांची उगवण क्षमता तपासून समाधान व्यक्त केले. बचत गटाचे पदाधिकारी व शेतकऱ्यांनी परिसरातील प्रमुख पिके असलेल्या सोयाबीन, बटाटा आणि भात पिकांच्या सद्यस्थितीविषयी अधिकाऱ्यांना सविस्तर माहिती दिली.
शेतकऱ्यांशी संवाद साधताना तालुका कृषी अधिकारी श्री. वैभव विश्ववे यांनी सांगितले की, “औदर गावातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान समजावे यासाठी लवकरच विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल. यासाठी कृषी विज्ञान केंद्र (KVK), नारायणगाव येथील तज्ज्ञ शास्त्रज्ञांना आमंत्रित केले जाईल.”
या पाहणी दौऱ्यावेळी तालुका कृषी सदस्य महेश मेदगे, बाळासाहेब मेदगे, सागर मेदगे यांच्यासह ‘राम कृष्ण हरी शेतकरी बचत गटा’चे अध्यक्ष, सदस्य व गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषी अधिकाऱ्यांच्या या भेटीमुळे आणि मिळालेल्या आश्वासनामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Share this content:
