प्रतिनिधी-मनोहर गोरगल्ले
आळंदी, ता. खेड : आळंदी शहरातील वाहतूक व्यवस्थे बाबत तसेच वाहनांवर करण्यात येणाऱ्या कारवाई बाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत असून, या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) व्यापारी आघाडीच्या वतीने ७ सप्टेंबर २०२६ रोजी तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे.
याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) व्यापारी आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र राज्य अध्यक्षा नियतीताई विकास शिंदे यांनी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आळंदी गावातील प्रदक्षिणा मार्ग, भाजी मंडई, मरकळ रोड आदी ठिकाणी पार्किंगबाबत स्पष्ट सूचना देणारे फलक अथवा नो-पार्किंग बोर्ड नसतानाही वाहतूक पोलिसांकडून वाहनांवर कारवाई करण्यात येत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. वाहन उचलताना नागरिकांना योग्य सूचना न देता तसेच काही ठिकाणी मनमानी पद्धतीने कारवाई केली जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
वाहनचालकांना कायद्यानुसार कारवाईपूर्वी योग्य सूचना देणे, नो-पार्किंग अथवा पार्किंगबाबत स्पष्ट फलक लावणे आणि वाहतूक व्यवस्थेबाबत नागरिकांना मार्गदर्शन करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने योग्य ती कार्यवाही न केल्यास ७ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता आळंदी पोलीस स्टेशनसमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनाची प्रत तहसीलदार खेड, प्रांताधिकारी खेड, आळंदी पोलीस स्टेशन, वाहतूक विभाग आळंदी तसेच आळंदी नगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.
Share this content:
